Shamrao Patsanstha Khed Protest: पिग्मी एजंटचे बेमुदत उपोषण; ठेवीदारांचा संताप
खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ठेवीदारांचा संताप शिगेला पोहोचला आहे. अनेक महिन्यांपासून न्यायाची प्रतीक्षा करूनही संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत संस्थेचे पिग्मी एजंट सुभाष गंगाराम झोरे (Subhash Gangaram Zhore) हे ३१ जुलैपासून खेड येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. या उपोषणाला संस्थेतील ठेवीदारांनीही लेखी पाठिंबा दर्शविला आहे.

सुभाष गंगाराम झोरे (Subhash Gangaram Zhore) यांनी खेडच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण २०१७-१८ पासून पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून कार्यरत होतो. गेली आठ वर्षे आपण गावागावात फिरून ठेवीदारांकडून पिग्मी, आरडी व मुदत ठेवींच्या रकमा गोळा करून पतसंस्थेत नियमितपणे जमा केल्या होत्या. मात्र ठेवीदार व पिग्मी देणाऱ्या ठेवीदारांच्या मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना पतसंस्थेकडून पैसे मिळत नव्हते.
त्यामुळे संबंधित व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता असल्याचा संशय निर्माण झाल्याने ते हतबल झाले. अनेक ठेवीदारांच्या आयुष्यभराच्या बचती धोक्यात आल्या. ठेवीदार रोज पैसे परत मिळावेत म्हणून घरी येऊ लागले. यामुळे आपण अडचणीत आलो. मात्र ठेवीदारांच्या रकमेबाबत पतसंस्था कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही. पतसंस्था आर्थिक डबघाईस आली असल्याचे लक्षात आल्यानंतर आपण ठेवीदारांचे व पिग्मी देणाऱ्यांचे पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू केले.
तसेच पतसंस्थेवर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
Shamrao Patsanstha Khed Protest









