Wild Vegetable Exhibition Sindhudurg
सिंधुदुर्गच्या ग्रामीण संस्कृतीची परंपरा, निसर्गाने दिलेल्या रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना रुजवणारा एक आगळावेगळा उपक्रम कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय (Shri Vasudevanand Saraswati Vidyalaya) येथे उत्साहात पार पडला. विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘रानभाजी प्रदर्शन व गावठी बाजार’ या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतातील आणि परिसरातील विविध रानभाज्या, गावठी धान्ये, पारंपरिक खाद्यपदार्थ, मसाले, घरगुती पदार्थ तसेच दुर्मिळ वनभाज्या प्रदर्शनासाठी आणल्या. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या स्टॉलवरील पदार्थांचे पौष्टिक महत्त्व, त्यातील जीवनसत्त्वे, औषधी गुणधर्म आणि ते बनविण्याची पद्धतही अभ्यागतांना समजावून सांगितली.

आजच्या रासायनिक शेतीच्या आणि फास्टफूडच्या युगात नैसर्गिक, सेंद्रिय आणि गावठी अन्नपदार्थांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरला. ‘कमवा आणि शिका’, ‘शिका आणि विका’ या संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाला. आपल्या आई-वडिलांचे कष्ट, शेतीचे महत्त्व, बाजारपेठेतील व्यवहार आणि ग्राहकांशी संवाद या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्या.
यावेळी शिक्षकांनी रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व सांगताना गावठी भाज्या शरीरासाठी किती लाभदायक आहेत, त्यामधील जीवनसत्त्वे आणि पोषक घटक आरोग्य टिकवण्यासाठी किती आवश्यक आहेत, याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आणलेल्या निरफणस, बांबूचे कोंब, विविध रानभाज्या आणि पारंपरिक खाद्यपदार्थांची माहिती देत त्यांची बाजारपेठेतील किंमत आणि विद्यालयातील वाजवी दर याचीही माहिती देण्यात आली.

विद्यालयात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, आत्मविश्वास, विक्री कौशल्य, आर्थिक व्यवहाराची जाण आणि पारंपरिक अन्नसंस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थिनी जान्हवी सिताराम परब (Janhavi Sitaram Parab) हिने आपल्या स्टॉलवर अप्पे, दुधाचे वडे, खोबऱ्याची वडी, लाडू, मिठातल्या मिरच्या आणि विविध रानभाज्यांचे प्रदर्शन भरवत या उपक्रमातून कमाईसोबतच आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव होत असल्याची भावना व्यक्त केली.
तर विद्यार्थी प्रज्ञेश निलेश निमळेकर (Pragyesh Nilesh Nimlekar) याने गावठी पीठ, खारे आंबे, तवळी, कुकडी तांदूळ, चणा डाळीचे लाडू, नाचणी, कुळीथ यांसारखे अनेक पारंपरिक पदार्थ विक्रीसाठी ठेवत ‘शिका आणि विका’ हा संदेश दिला.
ग्रामीण परंपरा, आरोग्यदायी जीवनशैली, स्वावलंबन आणि उद्योजकतेची बीजे विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणारा हा उपक्रम उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच गावठी अन्नसंस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला.









