लांजा, रत्नागिरी
Anjanari Ghat Truck Fire : लांजा तालुक्यातील अंजणारी घाटात तीव्र उतारावर ट्रकचा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकला भीषण आग लागल्याने घटनास्थळी मोठी धावपळ उडाली. स्थानिकांनी प्रसंगावधान राखत ट्रक चालकाला वाचवण्यात यश मिळवले.
गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने पेट घेतल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेच्या मदतीने चालक आणि क्लिनर यांना सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी लांजा येथे आणण्यात आले. या अपघातात चालक आणि क्लिनर भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
भगवान महादेव सांबरे जिजाऊ संस्था (Bhagwan Mahadev Sambare Jijau Sanstha) यांच्या रुग्णवाहिकेने तात्काळ मदत करत दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तीव्र उतारावर ट्रक पलटल्यानंतर ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाट हा अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या घाटातील तीव्र उतारामुळे यापूर्वीही अनेक अपघात होऊन जीवितहानी तसेच वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
Anjanari Ghat Truck Fire









