खेड, रत्नागिरी
Swaroopa Behen; ब्रह्माकुमारी स्वरूपा बहन यांचे आकस्मिक निधन; खेडच्या ईश्वरीय परिवारावर शोककळा
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र, खेड येथे ईश्वरीय सेवा आणि समाजजागृतीच्या कार्यात आयुष्य समर्पित करणाऱ्या ब्रह्माकुमारी स्वरूपा बहन (Brahma Kumari Swaroopa) यांचे दि. ११ रोजी रात्री अडीचच्या सुमारास आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने खेडसह रत्नागिरी जिल्ह्यातील ईश्वरीय परिवारावर शोककळा पसरली असून, त्यांच्या जाण्याने आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
स्वरूपा कांतीलाल गांधी (Swaroopa Behen) हे त्यांचे मूळ नाव असून, खेड हे त्यांचे मूळ गाव. ब्रह्माकुमारी स्वरूपा बहन यांनी काही वर्षे महाड आणि मुंबई येथे ईश्वरीय सेवाकार्य केले. गेल्या चार वर्षांपासून त्या खेड येथे सेवा देत होत्या. राजयोग प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. तसेच व्यसनमुक्ती अभियानात त्यांनी अग्रणी भूमिका बजावत समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या माध्यमातून आयोजित विविध सामाजिक, आध्यात्मिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले. रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी निःस्वार्थ भावनेने समाजसेवा केली. अत्यंत नम्र स्वभाव, सदा हर्षित वृत्ती, सत्यता, स्वच्छता, प्रामाणिकपणा आणि समर्पणभावना अशा अनेक गुणांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. बहुगुणी आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून त्या सर्वांच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या.
त्यांच्या आकस्मिक निधनाची वार्ता समजताच मुंबई, पुणे, महाड, कोल्हापूर, इस्लामपूर, रत्नागिरी, दापोली, चिपळूण यांसह विविध ठिकाणांहून ईश्वरीय परिवारातील सदस्य तसेच नातेवाईक खेडमध्ये दाखल झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी वातावरण अत्यंत भावुक झाले होते.
दि. १२ रोजी दुपारी चार वाजता आध्यात्मिक वातावरणात, ‘ओम शांती’च्या ध्वनीसह ईश्वरीय संगीताच्या साक्षीने ब्रह्माकुमारी स्वरूपा बहन (Swaroopa Behen) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सेवाकार्याच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या जाण्याने ईश्वरीय परिवारात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.
लहानपणापासून त्यांच्यावर नियमित औषधोपचार सुरू होते आणि त्या नियमितपणे औषधे घेत होत्या. मात्र, त्यांचे अचानक निधन झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
निःस्वार्थ सेवा, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि समाजजागृतीच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनाला दिशा देणाऱ्या ब्रह्माकुमारी स्वरूपा बहन (Swaroopa Behen) यांच्या स्मृती त्यांच्या सेवाकार्यातून सदैव जिवंत राहतील. त्यांच्या आकस्मिक निधनाने खेडच्या ईश्वरीय परिवारासह समाजमन हळहळले आहे, अशी भावना खेड सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी गीता बहन (Brahma Kumari Geeta Behen) यांनी व्यक्त केली.









