मुंबई गोवा हायवेवर नागोठणा सुकेळी खिंडीत कंटेनर पलटी झाल्याने दुर्घटना घडली. येथील तीव्र उताराच्या वळणावर ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या मार्गावरील दुभाजकावर आदळून कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. सुकेळी खिंडीत झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. सध्या अपघात झालेल्या कंटेनरला क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन पोलिसांनी वाहतूक सुरळीत सुरू केली आहे.दरम्यान, अपघात झालेल्या कंटेनरमध्ये केमिकल असल्याने फायर ब्रिगेड व सह्याद्री वन्यजीव रेस्क्यू टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती. फायर ब्रिगेड व रेस्क्यू टीमच्या मदतीने अपघात झालेल्या ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या ड्रायव्हरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी अधिकचा तपास नागोठणे पोलीस करीत आहेत.