Rotary School Khed : रोटरी इंग्लिश स्कूलच्या मान्यतेबाबत चौकशीची मागणी
खेड (प्रतिनिधी) : खेड येथील रोटरी इंग्लिश स्कूलच्या (Rotary School Khed) मान्यतेबाबत विधान परिषदेत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शाळेची तातडीने सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची शासनाने हमी द्यावी, अशी मागणी अनुज अनंत जोशी (Anuj Anant Joshi) यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त तसेच रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
विधान परिषदेत सदस्य अॅड. अनिल परब यांनी रोटरी इंग्लिश स्कूलच्या मान्यतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शाळेची अंतिम मान्यता नसल्यास तिची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, जोशी यांच्या मुलीचा रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये (Rotary School Khed) शिक्षणाचा हक्क (RTE) कायद्यांतर्गत प्रवेश झाला असून ती सध्या इयत्ता दुसरीत शिक्षण घेत आहे. RTE अंतर्गत प्रवेश असूनही शाळेकडून वेळोवेळी पुस्तके, शैक्षणिक साहित्य व अन्य विविध कारणांसाठी रक्कम स्वीकारण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. मात्र, या रकमेची कायदेशीर पावती अद्याप देण्यात आलेली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

सात मागण्यांकडे शासनाचे लक्ष
निवेदनात रोटरी इंग्लिश स्कूलच्या मान्यतेबाबत तातडीने सखोल चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येणार नाही याबाबत शासनाने स्पष्ट आदेश द्यावेत, तसेच RTE अंतर्गत विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने घेतलेल्या रकमांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय स्वीकारलेल्या रकमांची चौकशी करून कायदेशीर पावत्या देण्याबाबत तसेच नियमबाह्य वसूल केलेली रक्कम परत करण्याबाबत कार्यवाही करावी, दोषी संस्था चालक, शाळा व्यवस्थापन व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व कर्मचाऱ्यांचे भवितव्य सुरक्षित राहील याची शासनाने लेखी हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच रोटरी प्रतिष्ठान संचलित शाळेला सन २००७ ते सन २०२६ या कालावधीत शासनाकडून मिळालेल्या पुरस्कारांचीही चौकशी करून पुरस्कार प्रदान करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या सदस्यांची चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शाळेच्या मान्यतेबाबत शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने चौकशी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश, शैक्षणिक नोंदी, भवितव्य आणि RTE अंतर्गत मिळणारे सर्व अधिकार अबाधित राहतील, याची लेखी हमी द्यावी. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा अनुज अनंत जोशी (Anuj Anant Joshi) यांनी दिला आहे.









