खेड, रत्नागिरी
खेडच्या विकासकामांना (Khed Development) गती; १५८ कोटींच्या निधीतून विविध प्रकल्प मार्गी
खेड नगर परिषदेच्या बुधवारी झालेल्या तिसऱ्या सर्वसाधारण सभेत शहराच्या (Khed Development) विकासाशी संबंधित तब्बल ५६ विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. शिवसेना-भाजप युतीच्या सत्ताकाळात नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत विकासकामे सुरू असल्याची माहिती नगराध्यक्षा माधवी बुटाला (Madhavi Butala), गटनेते निकेतन पाटणे (Niketan Patane) आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माधवी बुटाला (Madhavi Butala) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला सर्व सदस्य उपस्थित होते. गेल्या आठ महिन्यांत तीन सर्वसाधारण सभा घेण्यात आल्या असून विविध समित्यांच्या बैठका नियमितपणे पार पडत असल्याची माहिती निकेतन पाटणे (Niketan Patane) यांनी दिली.

क्रीडा संकुलासह विविध प्रकल्पांना मंजुरी
शहरातील आरक्षण क्रमांक १४ मध्ये लोकनेते रामदाभाई कदम (Ramdabhai Kadam) क्रीडा संकुल विकसित करण्यात येत असून त्यामध्ये जलतरण तलाव, जॉगिंग ट्रॅक आणि व्यायामशाळेचा समावेश करण्यात आला आहे. तसेच खेड-महाड नाका परिसरात व्यापारी संकुल, मटण-मच्छी मार्केट, दवाखाना आणि उद्यानांची कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली.
क्रीडांगणाला लोकनेते रामदाभाई कदम (Ramdabhai Kadam), आरोग्यधामाला हिराचंद परशुराम बुटाला (Hirachand Parshuram Butala), व्यापारी संकुलाला तू. बा. कदम (T. B. Kadam) आणि मटण मार्केटला हसन (लालुशेठ) मुसा (Hasan Lalusheth Musa) यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. या नामकरणाला शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी मंजुरी दिली असून निधीसाठी योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.

१५८ कोटींचा निधी; मूलभूत सुविधांवर भर
नगरपरिषदेला आतापर्यंत १५८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यातून रस्ते विकास, सांडपाणी व्यवस्थापन, पर्जन्यजल व्यवस्थापन तसेच इतर विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.
बंदर नाका येथील क्रोकोडाईल पार्कचा विषय प्रलंबित असला तरी बोटिंग क्लब आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामांना पुन्हा मंजुरी देण्यात आली आहे. तसेच खांबतळे येथील सरोवर संवर्धन, म्युझिकल फाऊंटन आणि तलाव सुशोभीकरणाचे कामही प्रस्तावित असल्याची माहिती देण्यात आली.
‘खोकेमुक्त’ शहरासाठी नियोजन
पालिकेच्या विद्यमान कार्यालयीन इमारतीचे दोन भागांत विभाजन करून एका भागात व्यापारी संकुल आणि दुसऱ्या भागात पालिकेचे कार्यालय विकसित करण्याचे नियोजन आहे. व्यापारी संकुल उभारल्यानंतर शहरातील अनधिकृत खोके कमी होऊन ‘खोकेमुक्त’ शहराच्या दिशेने वाटचाल होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
थकित कर वसुलीसाठी कठोर पावले उचलण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी शौचालय अनुदान उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेला माधवी बुटाला (Madhavi Butala), निकेतन पाटणे (Niketan Patane), संजय मोदी (Sanjay Modi), सुनील दरेकर (Sunil Darekar), रसिका खेडेकर (Rasika Khedekar), कुंदन सातपुते (Kundan Satpute) आणि प्रेमळ चिखले (Premal Chikhale) उपस्थित होते.









