गुहागर, रत्नागिरी
Guhagar एसटीचा अजब कारभार! विद्यार्थी वेठीस?
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर (Guhagar) आणि चिपळूण एसटी प्रशासनाच्या कारभाराविरोधात विद्यार्थी, पालक आणि प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गुहागरमधून सावर्डे मार्गे जाणारी रत्नागिरी एसटी बस सलग दोन दिवस सुटली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सकाळी साडेआठ वाजता येणारी ही बस सकाळी १० वाजेपर्यंत न आल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ऐन शाळेच्या वेळेत बस रद्द झाल्याने संतप्त पालकांनी आणि प्रवाशांनी एसटी प्रशासनाला जाब विचारला आहे.

तसेच ३ ऑगस्ट रोजी चिपळूणहून गुहागरच्या (Guhagar) दिशेने दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत धावणाऱ्या आठ एसटी बसेसपैकी एकाही बसने चिपळूण नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळील मिरजोळी स्टॉप (Mirjoli Stop) येथे थांबा घेतला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हातात पास असूनही विद्यार्थ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेचे काही व्हिडिओ विद्यार्थ्यांनी चित्रीत करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचेही सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर बस सेवा रद्द होण्यामागील कारण काय, तसेच नियोजित थांब्यांवर बसेस का थांबल्या नाहीत, याबाबत परिवहन विभागाने स्पष्टीकरण द्यावे आणि संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.









