नवी मुंबई अपघात (Navi Mumbai Accident) प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. नवी मुंबई येथील करावे गावाजवळ भरधाव वेगात असलेल्या अनियंत्रित इनोव्हा कारने रस्त्यावर उभ्या तसेच चालू असलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या धक्कादायक घटनेत सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे अपघात करणाऱ्या कारवर ‘पोलिस’ अशी नेमप्लेट असल्याचे आढळले. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा नवी मुंबई अपघात (Navi Mumbai Accident) घडला.
अपघातानंतर वाहनाची तपासणी करण्यात आली असता, कारमध्ये मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचे ओळखपत्र सापडल्याची माहिती समोर आली आहे. या उघडकीमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून पोलिस विभागातही चर्चा सुरू झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित चालकाची वैद्यकीय तपासणी, वाहनाची कागदपत्रे आणि नेमप्लेटचा गैरवापर झाला का, याचा तपास सुरू आहे. नवी मुंबई अपघात (Navi Mumbai Accident) प्रकरणी पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









