रविवारी देवीच्या पालखीचे भक्तिभावाने स्वागत; दुसऱ्याच दिवशी पहाटे काळाचा घाला – कोंडीवली रोहिदासवाडीवर शोककळा (Santosh Kondwilkar heart attack)
खेड : शिमगोत्सवासाठी गावी आलेल्या कोंडीवली रोहिदासवाडी येथील संतोष भागोजी कोंडविलकर (वय ४९) यांचे सोमवार दिनांक ९ मार्च २०२६ रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मात निधनामुळे कोंडीवली परिसरासह मुंबईतील नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Santosh Kondwilkar heart attack)
सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून मुंबईमध्ये यशस्वी व्यवसाय करणारे संतोष कोंडविलकर हे शिमगोत्सवानिमित्त गावी आले होते. रविवार दिनांक ८ मार्च रोजी त्यांनी सहकुटुंब व सहपरिवार देवीच्या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले.

रोहिदासवाडी येथील विठ्ठल मंदिरात त्यांनी उत्साहात पालखी नाचवत शिमगोत्सवाचा आनंद लुटला. मात्र या आनंदाच्या वातावरणातच दुसऱ्याच दिवशी पहाटे काळाने घाला घालत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
संतोष कोंडविलकर हे गावाच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेणारे व सर्वांशी मनमिळावू स्वभावाने वागणारे व्यक्तिमत्त्व होते. “संतोष दादा” या नावाने ते परिसरात परिचित होते. त्यांच्या साध्या, मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. (Santosh Kondwilkar heart attack)
मंगळवार दिनांक १० मार्च रोजी कोंडीवली रोहिदासवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
अकस्मात निधनामुळे कोंडीवली गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
(Santosh Kondwilkar heart attack)









