कोकणाला कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील तळवडे नदीला पूर आल्याने तळवडे बाजारपेठेत पाणी शिरलं. बाजारपेठेतील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं आणि अनेक दुकानात पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. अनेक भागातील रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे . जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. सखल भागाला तर नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने सिंधुदुर्गवासीयांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.
पोलादपुरमधील चोळई गावाला दरडी कोसळण्याचा धोका
कालपासून सुरु असलेल्या तुफानी पावसामुळे पोलादपुर तालुक्यातील चोळई गावाला दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावालगतच्या डोंगरातुन दरडी कोसळण्यास सुरुवात झाली असुन सुरक्षिततेचा उपाय म्हणुन संपुर्ण चोळई गावातील २० ते २५ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. दरड कोसळण्याच्या घटनांमुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला देखील धोका निर्माण झाला आहे. पोलिस, महसुल विभाग आणि नरवीर रेस्क्यु टिम घटना स्थळी दाखल झाली आहे.
लांज्यात लोकवस्तीत पाणी घुसलं
मुंबई गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी बस स्टॉप जवळील लोकवस्तीमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिकाची तारांबळ उडाली आणि त्यातच तीव्र उतरावरील रस्त्याला गटार नसल्याने हे पाणी रहिवासी वस्तीमध्ये शिरले आहे. लांजा आपत्कालीन कक्षाला सूचना मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि तलाठी घटनास्थळी पोचले आहेत.
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
रायगड जिल्ह्यात काल दुपार नंतर पावसाचा जोर वाढला असून महाडसह पोलादपूर, माणगाव, म्हसळा तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. संपूर्ण जून महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाल्यानंतर आता पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू झाली आहे. नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत आणि नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून प्रशासनानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे . उत्तर रायगडामध्ये देखील अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.
संपूर्ण चिपळूण शहरात पाण्याचा साम्राज्य
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे त्याचा फटका चिपळूण तालुक्याला देखील बसला असून चिपळूण शहर अख्ख जलमय झालं आहे. चिपळूण शहरातील मुंबई -गोवा महामार्गाला तर नदीचे रूप आलेलं पाहायला मिळत आहे . मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणीच नदीचे रूप आलं असून रस्त्याच्या कडेला असलेली सर्व गटारं तुंबल्याने सर्व पाणी रस्त्यावर आलं आहे. शहरातील डी बी जे कॉलेज आणि शिवाजीनगर परिसरात आणि एसटी स्टँड परिसरात देखील पाणी साचालयला कालपासूनच सुरुवात झाली होती . कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्हयाला अक्षरशः झोडपून काढल आहे.








