मुंबई: विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना विधानभवनाच्या परिसरात रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. आज सकाळी ९ वाजता विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर काहीवेळातच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया काहीशा उंचावल्या गेल्या आहेत. चंद्रेशखर बावनकुळे यांनी काहीवेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. विशेष म्हणजे काहीवेळाने याठिकाणी एकनाथ खडसे हेदेखील दाखल झाले. या तिघांच्या भेटीमागचा नेमका उद्देश अद्याप कळू शकलेला नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट मतदारसंघातील कामांबाबत असली, असे सांगितले जात असले तरी या भेटीबाबात निरनिराळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मात्र, चंद्रशेखर बावनकुळे आज सकाळपासूनच भाजपचे पाचही उमेदवार जिंकणार, या आत्मविश्वासाने वावरत आहेत. काहीवेळापूर्वीच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होतील. प्रसाद लाड हे पाचव्या जागेवरून सर्वाधिक मतांनी विजय होतील. महाविकास आघाडी सरकार हे फक्त मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसाठी काम करत आहे. त्यांच्याकडून आमदारांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अनेक आमदार ठाकरे सरकारवर नाराज आहेत. हे आमदार विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
विधान परिषदेच्या निवडणुकीत एका-एका मतासाठी प्रत्येक उमेदवार प्रयत्न करत असताना विधिमंडळात एक मजेदार प्रसंग घडला. अचनाकपणे समोर आलेल्या काँग्रेस नेत्यांना पाहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी गुगली टाकली. ‘आम्हाला वाटलं आमची तीन मतं इकडं आहेत’, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी मारलेला षटकार पाहून मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, बंटी पाटील पोट धरुन हसले. यावर सतेज पाटलांनीही प्रत्युत्तर दिले. ‘तो मी नव्हेच’, असं सतेज पाटील म्हणताच फडणवीस, दरेकर खो खो हसायला लागले