यंदा दिवाळी ४ दिवस; कधी आहे लक्ष्मी पूजन, भाऊबीज? जाणून घ्या तारीख आणि मुहूर्त

- Advertisement -

मोहन दाते (दाते पंचांगकर्ते)

यावर्षी दिवाळी (Diwali 2024) ४ दिवस असून १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, १ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी लक्ष्मीपूजन, २ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा आणि ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीज या प्रमाणे ४ दिवस दिवाळीचे आहेत.

१ नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून दिवसभर असलेली अमावास्या सूर्यास्त झाल्यावर संपूर्ण भारतात कमी अधिक काळ आहे. सूर्यास्तानंतर एक घटी अमावास्या असेल. तर संदेह नाही हे वचन केवळ पुष्टीकारक असे आहे. त्यास विशेष असे महत्व नसून सूर्यास्त समयी प्रदोषकाळात स्पर्श असलेली अमावास्या आणि सूर्यास्ताच्या पूर्वी गौण प्रदोषकाळात सुद्धा असलेल्या तसेच प्रतिपदा युक्त अशा अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणे हे फलदायी असते. (यापूर्वी सन १९६२, १९६३, २०१३ मध्ये दुसरे दिवशी प्रदोषकाळात कमी वेळ असताना लक्ष्मीपूजन दिलेले आहे.)

धर्मशास्त्रात एखाद्या व्रताविषयी ३-४ वचने असतात. अशा वेळेस त्यांचा समन्वय करुन उत्सवामध्ये एकवाक्यता आणणे सध्याच्या काळात खूप महत्वाचे आहे. याच विचाराने ग्रंथोक्त वचनांचा आधार घेऊन कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य पू. विजयेंद्र सरस्वती यांनी देखील १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे असे निवेदन केले आहे. महाराष्ट्रात दाते पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर, महाराष्ट्रीय पंचांग नागपूर, निर्णय सागर, सोमण पंचांग, स्वामी समर्थ पंचांग तसेच भारतातील जवळ जवळ १०० पेक्षा अधिक पंचांगात आणि अन्य सर्व कॅलेंडरमध्ये सुद्धा १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. तसेच आपण गेली अनेक वर्षे जे पंचांग किंवा कॅलेंडर वापरत आहोत, त्यामध्ये दिल्याप्रमाणे सण-उत्सव साजरे करावेत, संभ्रम करून घेऊ नये.

वसुबारस (२८ ऑक्टोबर २०२४, सोमवार)

या दिवशी सौभाग्यव्रती स्त्रीया एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे खालील श्लोक म्हणून सूर्यास्तानंतर पूजन करतात.
ततः सर्वमये देवि सर्व देवैरलंकृते । मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनी ।।

अर्थ – हे सर्वात्मिक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर.

या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. आज शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाई उपलब्ध नसतात. अशावेळेस गाय वासराच्या मूर्तीचीदेखील पूजा करता येते. ते ही शक्य नसल्यास गाईच्या चित्राची पूजा करता येते. मात्र अशा वेळेस गाईच्या गोग्रासाकरिता म्हणून आपल्या भागातील गोशाळेस शक्य ते सहकार्य करावे. (Vasubaras)

धनत्रयोदशी, यमदीपदान (२९ ऑक्टोबर २०२४, मंगळवार)

आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी, यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने – नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यू म्हणजेच अकाली, अपघाताने मृत्यू येऊ नये याकरिता सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा व घरातील प्रत्येकाने खालील श्लोक म्हणून दिव्यास नमस्कार करावा.

मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।

त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।

नरक चतुर्दशी – (३१ ऑक्टोबर २०२४, गुरुवार)

नरकासुराने १६ हजार १०८ स्त्रीयांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रीयांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.

शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे. पूर्वीपिक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यू निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे. अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाला खालील १४ नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करण्यास सांगितले आहे. वडील हयात असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व नसलेल्यांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी तर्पण करावे. १) यम २) धर्मराज ३) मृत्यू ४) अंतक ५) वैवस्वत ६) काल ७) सर्वभूतक्षयकर ८) औदुंबर ९) दध्न १०) नील ११) परमेष्ठिन १२) वृकोदर १३) चित्र १४) चित्रगुप्त.

लक्ष्मीकुबेर पूजन – (१ नोव्हेंबर २०२४, शुक्रवार)

शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे ( Laxmi Pujan) दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.

जाणून घ्या लक्ष्मीपूजन मुहूर्त

नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् ।।

अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि

धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥

अशी कुबेराची प्रार्थना करावी. यापूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात..

लक्ष्मीपूजन मुहूर्त (१ नोव्हेंबर २०२४, शुक्रवार)

दु. ३ ते ५:१५, सायं. ६ ते ८:३०, रात्री ९:१० ते १०:४५

(लक्ष्मी पूजन विषयक सविस्तर खुलासा दाते पंचांग पान ८५ वर पाहावा.)

बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) – (२ नोव्हेंबर २०२४, शनिवार)

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते.

वहीपूजन मुहूर्त (२ नोव्हेंबर २०२४, शनिवार)

पहाटे ४:१० ते ६:४०, सकाळी ८ ते १०:५०

यमद्वितीया (भाऊबीज) – ( ३ नोव्हेंबर २०२४, रविवार)

नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज (Bhaubeej) सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे सांगितले आहे.

दिवाळी का म्हटले जाते?

दिवाळीच्या या चार दिवसांत सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.

संपूर्ण समाजात – कुटुंबात एकोपा राखावा

वर्षभरातील इतर सण- उत्सव यांचे प्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे असते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धत जवळजवळ सारखीच आहे. मुख्यतः घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात. पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात – कुटुंबात एकोपा राखला जातो.

प्रत्येक धर्मीयांच्या सण – उत्सवामुळे संपूर्ण भारतात खरेदी- विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते. अर्थातच त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होऊन भारताची प्रगति होण्यात या सण-उत्सवांचे मोठे सहकार्य लाभते ही गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

12,546FansLike
75,569FollowersFollow
2,564FollowersFollow
191,558SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles