चिपळूण : अनेक दाखले मिळवण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे; परंतु अनेक दाखले हे ऑनलाइन मिळत असल्याने विद्यार्थी व पालकांना अनेक तांत्रिक व आर्थिक अडचणींना सामोरे जाऊनही वेळेवर दाखले मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अपुऱ्या कागदपत्रांमुळे प्रवेश रखडण्याची धास्ती आहे. यात काही सायबर चालकांची चांदी सुरू असल्याची तक्रार पालक करत आहेत.ऑफलाइन दाखले देण्याची मागणी केली जात आहे.
तालुक्यात नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला असून, दहावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्र, उत्पादनाचा दाखला आदींची आवश्यकता असते. यासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे; परंतु अनेक दाखले हे ऑनलाइन मिळत असल्याने विद्यार्थी व पालकांपुढे अडचणींना सामोरे जाऊनही वेळेवर दाखले मिळत नाहीत.
ग्रामीण भागातील सायबरवाले वीज नसणे, सर्व्हरडाऊन, नेटवर्क नाही अशी कारणे देत विद्यार्थ्यांना दाखल्यासाठी हेलपाटे मारायला लावत आहेत. दाखल्याचा अर्ज ऑनलाइन करण्यासाठी कोणतीही नोंदणी फी नसताना २०० ते ३०० रुपये विद्यार्थ्यांकडून घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.