चिपळूण – चिपळूण येथील पेठमाप भागात राहणाऱ्या एका महिलेचा घरात कोणी नसताना अज्ञातांनी तिच्या अंगावर ऍसिड टाकून चेहऱ्यावर वार करत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत महिला घरामध्ये एकटी असतानाच अज्ञातांनी तिचा खून केला. सोमवारी तिचा मुलगा क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी येथे गेला असतानाच ही धक्कादायक घटना घडली आहे.
मृत महिला ही आपल्या मुलासोबत पेठमाप येथे राहत होती. कुलसूम अन्सारी अस मृत महिलेचं नाव असून चिपळूण पोलिसांनी श्वान पथकाच्या साहाय्यानं खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तापसकाम सुरू केलंय. दरम्यान मृत महिलेचा मुलगा हा आपल्या आईला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची आई फोन उचलत नव्हती.त्यावेळी मुलाने आपल्या मित्रांना घरी जाण्यासाठी सांगितलं. ज्यावेळी मित्र घरी पोहोचले त्यावेळी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचं निदर्शनास आलं. त्यावेळी घाबरलेल्या मित्रांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतलं. यावेळी घरात कुलसूम अन्सारी यांचा मृतदेह एका बाजूला झाकून ठेवल्याचं निदर्शनास आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केलाय आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला.सोमवारी सकाळी या महिलेचा दफनविधी पोफळी सय्यदवाडी येथे करण्यात आला. दरम्यान या महिलेचा खून हा चोरीच्या प्रयत्नात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असलं तरी खरा खुनी कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी चिपळूण पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.