खेड, रत्नागिरी
खोपी–वेरळफाटा रस्त्याची दुरवस्था; कोट्यवधी खर्चानंतरही रस्ता नादुरुस्त
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खोपी ते वेरळफाटा (Khopi Veralfata Road) या महत्त्वाच्या मार्गाची दुरवस्था पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्ता आजही नादुरुस्त असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून केला जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, २०२३ ते २०२६ या कालावधीत रस्ते व पूल परीक्षण, देखभाल आणि दुरुस्तीसाठी सुमारे २ कोटी २ लाख ७९ हजार ४९८ रुपये, तर रस्त्याच्या सुधारणा आणि डांबरीकरणासाठी १ कोटी ८७ लाख १९ हजार ७०५ रुपये असा एकूण जवळपास चार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

मात्र, एवढा खर्च होऊनही रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला असून वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यालगतची झाडेही धोकादायक अवस्थेत असल्याने वादळी वाऱ्यात ती कोसळून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर (Khopi Veralfata Road) रस्त्याच्या कामाच्या दर्जाची प्रत्यक्ष तपासणी होते का, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदारांवर योग्य देखरेख ठेवली जाते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचीही चर्चा सुरू आहे.
या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेणार, कामाच्या गुणवत्तेची चौकशी होणार का आणि नागरिकांना सुरक्षित रस्ता कधी मिळणार, याकडे वाहनचालक आणि प्रवासी वर्गाचे लक्ष लागले आहे.









