मुंबई : एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं असताना आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. कायद्यानुसार पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो. गटनेत्यानं प्रतोदांची नेमणूक करायची असते. मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे. ते पत्र मी स्वीकारलं आहे, असं झिरवाळ यांनी म्हटलं आहे.
झिरवाळ यांनी म्हटलं की, नितीन देशमुख यांनी सांगितलं आहे की माझी सही इंग्रजीत आहे आणि पत्रावरील सही मराठीत आहे. त्यामुळं माझी सही ग्राह्य धरु नये. त्यामुळं मी ते तपासून घेणार आहे. त्यानंतर निर्णय घेऊ, असं झिरवाळ म्हणाले. झिरवाळ म्हणाले की, गटनेता म्हणून जे पत्र देण्यात आलेले आहे, यामध्ये अपक्ष आमदारांच्या देखील सह्या आहेत. शिवाय आणखी एक बाब नितीन देशमुख यांनी नमूद केलेली बाब म्हणजे माझी ती सहीच नाही याची देखील मी पडताळणी करणार आहे. कारण जर हे खरं असेल तर संख्या कमी होणार आहे. शिवाय अपक्ष आमदार देखील अशा सह्या करू शकत नाहीत. त्यामुळे पत्राबाबत शंका आहे. मी याचा आढावा घेऊन याबाबत निर्णय देणार आहे, असं ते म्हणाले.
झिरवाळ यांनी म्हटलं की, कायद्यानुसार पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो. गटनेत्यानं प्रतोदांची नेमणूक करायची असते. मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक गटनेतेपदी केली आहे. ते पत्र मी स्वीकारलं आहे. अजय चौधरी हे गटनेते आहेत. सुनील प्रभूंनी दिलेल्या सहीचं पत्र मी स्विकारलं आहे. दोन तृतीअंश आमदारांचा दावा अद्याप माझ्याकडं आलेला नाही. असा दावा करणं त्यांचा प्रश्न आहे. माझ्याकडे आल्यावर मी घटनेत असेल त्याप्रमाणे अभ्यास करुन निर्णय घेईल. जे सह्यांचं पत्र माझ्याकडं आलंय त्यात सह्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं त्यातही अभ्यास करुन मी निर्णय घेणार आहे, असं झिरवाळ आहे. यावर तर कुणालाही शंका येऊ शकते. कुणाचा अधिकार तिथं पोहोचू शकतो, त्याचा कायदेशीर दृष्ट्या अभ्यास करुनच निर्णय घेणार आहे, असंही झिरवळ म्हणाले.