रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ते कमी होण्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी ज्या भागातील रस्ते नादुरुस्त आहेत, त्या रस्त्यांची कामे संबंधित विभागांनी त्वरित पूर्ण करावीत, तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना संसदीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत खासदार विनायक राऊत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज संसदीय रस्ता सुरक्षा आढावा समिती बैठक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन शुभांगी साठे, पोलिस उपअधीक्षक (गृह) जगताप आदी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, रस्ता सुरक्षा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी रस्त्याची स्थिती चांगली असली पाहिजे; परंतु सध्या रस्त्याची परिस्थिती वाईट आहे. वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून ते रोखण्यासाठी नादुरुस्त रस्त्यांची संबंधित विभागाने तत्काळ दुरुस्ती करावी. त्यानंतर खासदार सुनील तटकरे म्हणाले, कोकणामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या अपघातांमध्ये मृत्युमुखी होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना रस्ता सुरक्षा समितीमार्फत सुचवल्या जाव्यात, हा समिती गठित करण्याचा उद्देश आहे. संबंधित विभागांनी आपल्या अखत्यारितील रस्ते दुरुस्त करावे तसेच अपघातप्रवण क्षेत्राची माहिती करून घेऊन सदर क्षेत्र हटवण्याची कार्यवाही करावी.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण यांनी जानेवारी २०१८ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत रस्ते अपघातांच्या सर्वेक्षणाची माहिती या वेळी समितीपुढे ठेवली. राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते, पूल, बोगदे यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.