वेळ आल्यानंतर मी सगळ्या गोष्टी बाहेर काढेन, असा इशारा राऊतांनी दिला आहे. विनायक राऊतांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “शिवसेनेला फोडण्याचा प्रयत्न कोकणात याआधीच झाला होता. पालीमध्ये बसून शिवसेनेचे वैभव नाईक यांना पाडण्यासाठी भाजप नेते नारायण राणे यांचे समर्थक उमेदवार यांना रसद पुरवण्यात आली होती.
नाईकांना पाडण्यासाठी राणेंच्या उमेदवाराला 50 लाख रुपये देण्यात आले होते”, असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. “शिवसेनेचे कुडाळ-मालवणचे उमेदवार वैभव नाईक यांना विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी नारायण राणेंचे त्यावेळचे उमेदवार यांना 50 लाख रुपये देऊन पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आमच्याच पक्षातील एका नेत्याने हे कृत्य केलं होतं, असा घणाघाती आरोप करत उदय सामंत यांना खासदार विनायक राऊत यांनी लक्ष केले. तसेच मालवणमधील आपल्याच न्याती बांधवाला शिवसेना पक्षामध्ये आणून आमदार करण्याचा उदय सामंतांचा घाट होता.
त्यांनी माझ्याकडे कितीतरी वेळ हे बोलून दाखवलं होतं. पण वैभव नाईक हेच आपल्या पक्षाचे खरे वैभव आहेत. आम्ही हा प्रस्ताव धुडकावून लावला होता”, असा दावा विनायक राऊतांनी केला आहे. विनायक राऊत यांच्या या आरोपांवर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी त्यांनी विनायक राऊतांवर सडकून टीका केली. “विनायक राऊत यांना आम्ही खासदार म्हणायचं की सर्कसमधला विदूषक म्हणायच? हा आमच्या कोकणवासियांना खरंच प्रश्न पडलेला आहे. विनायक राऊत हे खासदारकीपासून ते जे काही ऐशोआराम दाखवतात ते सर्वकाही उदय सामंत यांच्याकडून घ्यायचे.
दुसरा मुद्दा म्हणजे अडीच वर्षापर्यंत उदय सामंत यांच्याबरोबर होते तोपर्यंत हे महाशय गप्प का बसलेले? त्यांना 2019 पासून ती गोष्ट माहिती होती याचा अर्थ ते वैभव नाईक यांनाही फसवत होते. खरा गद्दार उदय सामंत आहेत की विनायक राऊत आहेत?”, असा सवाल नितेश राणे यांनी केला. दरम्यान, या आरोपांवर उदय सामंत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या सगळ्या गोष्टींची किव करावीशी वाटतेय, अशी प्रतिक्रिया दिली.
“मी अडीच वर्षच नाही तर गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करतोय. एवढ्या वर्षांत मी त्यांना कधीही वाईट दिसलो नाही. याचं खरं उत्तर त्यावेळचे राणे यांचे समर्थक उमेदवार रणजीत देसाई यांनी समर्पक दिलेलं आहे. मदत म्हणजे नेमकं कोणाला केली?
त्यांनी पुराव्यानिशी ते सिद्ध केलं तर मी कधीही समोर यायला तयार आहे. वैभव नाईकांनीही याबाबत खरं सांगावं”, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली. “त्यांनी जो आरोप केलाय की मी रसद पुरवली. एवढी रसद पुरवणारा मी माणूस नाहीय.
हे बदनाम करण्याचं काम सुरु आहे. असं बदनाम करुन उद्धव ठाकरेंची मर्जी संपादीत करायची, असं कदाचित त्यामागचं लॉजिक असू शकतं. ते मनापासून बोलत नाहीत. त्यांना कुणीतरी बोलायला लावलंय. पैशांच्या व्यवहाराबाबत त्यांनी बोलूच नये”, असं उदय सामंत म्हणाले.