अमरावती : अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहातून तीन कैदी पसार झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. कारागृह प्रशासनाकडून कैद्यांचा शोध सुरू झाला आहे. रोशन गंगाराम उईके, सुमित शिवराम धुर्वे व साहील अजमल कालसेकर अशी पसार झालेल्यांची नावे आहेत. ते भिंतीवरून उडी मारून मध्यरात्री पसार झाले.नमुद तिन्ही कैदी रात्री दीड ते अडीच वाजताच्या सुमारास जेलच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेल्याची माहिती पुढे आली. सकाळी ही माहिती कळताच कारागृह प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू झाली. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून एका बाजूने कारागृहाची शेती आहे तर दुसऱ्या बाजूने वडाळीकडे जाणारा रस्ता आहे.
बराकीतून त्यांनी ब्लँकेट घेतले व तीन ब्लँकेट बांधून ते भिंतीवर चढल्याची माहिती आहे. दोन ब्लँकेट कारागृहाच्या आतील बाजूने तर एक ब्लँकेट कारागृहाच्या बाहेर सापडले. या घटनेची तक्रार कारागृहाचे प्रभारी अधीक्षक के. बी. गिराशे यांच्यातर्फे तुरुंग अधिकारी हिरालाल भामरे यांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात केली आहे. मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारातील ही घटना असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
१२ नंबरच्या बराकीत होते
रोशन गंगाराम उईके व सुमित शिवराम धुर्वे यांच्याविरुद्ध शेंदूरजनाघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे दोघेही १ ऑगस्ट २०२१ पासून कारागृहात आहेत. तर साहील अजमल कालसेकर हा जन्मठेप भोगत आहे. तिघेही १२ नंबरच्या बराकीत होते.
साहीलने याआधीही केला पळून जाण्याचा प्रयत्न
रत्नागिरी येथील साहील अजमल कालसेकर याने आधीसुद्धा रत्नागिरीच्या जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याची वर्तणूक चांगली नव्हती. त्यामुळे त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले होते. तेथे सुद्धा वर्तणूक चांगली नसल्याने काही महिन्यांआधीच अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविले होते.