रायगड : कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा सर्वात जुना मार्ग असलेल्या महाड – भोर, पुणे – पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. महाड – पुणे मार्गावरील वरंध घाट धोकादायक ठरत आहे. काल दरड कोसळल्यानंतर आजपासून वरंध घाट आजपासून तीन महिने अवजड वाहतुकीसाठी बंद ठेण्यात आला आहे.अतिवृष्टीच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.
वरंध घाटात सातत्याने दरड रस्त्यावर खाली येत आहे. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी यांची घाट बंद ठेवण्याची अधिसूचना काढली आहे. सध्या संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती आहे. तसेच रस्ता खचण्याची शक्यता लक्षात घेऊन घाट वाहतुकीसाठी बंद ठेण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिवृष्टीच्या काळात हा घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. याबाबतची सूचना रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी काढली आहे. पावसाळ्याच्या कालावधीत येथील रस्ता खचण्याच्या तसेच दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. दोन दिवसांपूर्वी याच घाटात वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळली त्यात एकजण गंभीर जखमी झाला. त्यानंतर 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत घाट रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.