राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात आल्याने आता सर्वांनाच विधानसभेच्या प्रचाराचे वेध लागले आहेत. त्यासाठी,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून पहिलीच सभा रत्नागिरी येथून म्हणजेच कोकणातून होणार आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. आता विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे. त्यामुळेच, ते रत्नागिरी जिल्ह्यातून आपल्या निवडणूक प्रचारसभांची सुरूवात करत आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता रत्नागिरीतील जलतरण तलावाजवळ शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार बाळ माने यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यासोबत त्यांची लढत होईल. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे आणि भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू असून सभेस येणाऱ्या गर्दीला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे.