गुरूवारी झालेल्या जनता दरबारामध्ये काही अधिकारी गैरहजर होते तर काही अधिकारी अर्ध्यातच उठून निघून गेले. त्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी चांगलेच झापले.
अधिकार्यांनी मुख्यालय सोडू नये : ना. उदय सामंतांच्या स्पष्ट सूचना
रत्नागिरी- सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकार्यांनी कार्यालयातच थांबले पाहिजे, मला विचारल्याशिवाय कुणीही हेडक्वॉर्टर सोडू नये असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिले असून जनतेला विश्वासात घेऊन प्रशासन काम करते आहे, असा विश्वास सामान्य जनतेला वाटला पाहिजे, यासाठी जनता दरबार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.
गुरूवारी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्र्यांचा जनता दरबार पार पडला. जनता दरबारानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या जनता दरबारात 25 विभागांचे 100 पेक्षा जास्त अर्ज आले होते. 90 टक्के जनतेला न्याय देण्याची भूमिका घेण्यात यश आले, अशी माहिती ना. सामंत यांनी दिली. जिल्हा प्रशासन चांगल्या पध्दतीने काम करते आहे. अधिकार्यांनी आपल्या कार्यालयातच थांबावे, जनतेसाठी अधिक वेळ द्यावा, जनतेला प्रशासनाकडून चांगली वागणूक मिळाली पाहिजे, न्याय मिळत आहे अशी भावना जनतेची झाली पाहिजे, याबाबत शासन आणि प्रशासन या दोघांकडूनही जनतेला विश्वास मिळाला पाहिजे, असे ना. उदय सामंत यांनी सांगितले. जनता दरबारात काही विभागांचे अधिकारी उपस्थित नव्हते, यापुढील जनता दरबारात अधिकार्यांनी 3-4 तास थांबण्याची तयारी करून यावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या.