मुंबई : अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. राज भवनात पार पडलेल्या सोहळ्यात एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान,आजच्या या मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या नेत्यांवर विरोधकांसह चित्रा वाघ यांनी देखील टीका केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही निशाणा साधत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच सवाल केला आहे.
“स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे भाषणातून सांगत असतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असे ते बोलत असतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही. याची खंत आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतल्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत राठोड यांना मंत्रिपद देणं योग्य नसल्याचे म्हटलं आहे. पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं, हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे , असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.