रत्नागिरी : भगवती किल्ला येथील २०० फूट खोल दरीत तन्वी घाणेकर यांचा मृतदेह सापडल्या प्रकरणी पोलिस निष्कर्षापर्यंत आले आहेत. मृतदेहाची ओळख पटल्याने डीएनए चाचणी करण्याची गरज नाही. मात्र, कॉल रेकॉर्ड तपासल्याने काहीअंशी चित्र स्पष्ट झाले आहे. संशयित आता पोलिसांच्या टप्प्यात असून, लवकरच पुढील कारवाई होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे. तन्वी रितेश घाणेकर असे मृतावस्थेत सापडलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार पती रितेश घाणेकर यांनी दिल्यावर तपासाला गती मिळाली.
तन्वी २९ सप्टेंबरला सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ‘मी बाजारात जाऊन येते, उशीर झाला तर जेवण करून घ्या’ असे मुलगी आनंदी हिला सांगून दुचाकी (एमएच ०८ एक्स ७११६) घेऊन बाजारात गेल्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्या घरी न आल्याने पती रितेश यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. काल पर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. तन्वी घाणेकर यांची दुचाकी भगवती किल्ल्यानजीक दोन दिवसांपूर्वी आढळून आली. त्यानंतर शहर पोलिसांनी त्या परिसरात शोधमोहीम हाती घेतली. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
त्यानंतर कपल पॉइंट येथे दुर्गंधी येऊ लागल्याने सुमारे २०० फूट खोल दरीत जाऊन पोलिसांनी शोध घेतला, तेव्हा एका महिलेचा मृतदेह आढळून आला. किनाऱ्याखाली उतरून पोलिस पायवाटेने घटनास्थळी पोचले. मृतदेह प्लास्टिक बॅगेत भरून स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आला. तो विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. ही नेमकी आत्महत्या आहे की घातपात, आत्महत्या असेल तर त्याच्या मागे एवढे गंभीर कारण काय, याबाबत तपास सुरू आहे.
पोलिसांना घटनास्थळी मंगळसूत्र, पैंजण आणि गाडीची चावी सापडली आहे. यावरून त्यांची ओळख पटली आणि नातेवाइकांनी विच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, ही आत्महत्या आहे की घातपात, याचा तपास सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून काही माहिती मिळाली आहे.तन्वी यांचा मोबाईल शोधण्याचे काम सुरू आहे. परंतु, अजून तो मिळालेला नाही. त्यांच्या मोबाईल नंबरचे सहा महिन्यांचे कॉल डिटेल्स पोलिसांनी घेतले आहेत. यात महत्त्वाची माहिती पुढे आली असून, संशयित आता पोलिसांच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे हे प्रकरण लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.