अलिबाग : रायगड जिल्ह्यातील उमरठमध्ये तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणून ओळखलं जाणारे आंब्याचं झाडे कोसळले. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हे झाड मुळापासून उन्मळून पडले. तानाजी मालुसरे यांनी स्वत: हे झाड लावले होते, असे सांगितले जात आहे. झाडाच्या ढोलीत शिवकालीन शस्त्रे देखील सापडल्याचे सांगितले जात आहे. हे ऐतिहासिक झाड कोसळल्याने शिवप्रेंमी हळहळ व्यक्त करत आहेत.
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कर्मभूमी उमरठ येथील ऐतिहासिक महत्त्व असलेले शिवकालीन आंब्याचे झाड जोरदार पावसामुळे जमीनदोस्त झाले. या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही प्रमाणात स्मारकाच्या तटबंदीचे नुकसान झाले आहे.
नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या स्मारकात एक आंब्याचे झाड होते. हे साडे तीनशे वर्ष जुने झाड होते. काही वर्षांपूर्वी आंब्याची डहाळी तुटली असता त्यातून तलवारी पडल्या, असे सांगितले जात आहे. त्यातील दोन तलवारी येथे असून बाकीच्या तलवारी पुणे येथे नेल्या आहेत. हे झाड तानाजी मालुसरे यांचा इतिहासाची साक्ष होते, अशी चर्चा आहे. पावसामुळे कोसळलेले हे आंब्याचे झाड हटविण्याचे काम नरवीर रेस्क्यू टीम तर्फे युद्ध पातळीवर सुरु आहेत.