नवी मुंबईतील तळोजा येथे २ वर्षीय मुलीच्या हत्या प्रकरणी (Murder Case) आरोपीला अटक करण्यात आली आहे. पनवेल पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते (Prashant Mohite) यांनी सांगितले की, २५ मार्च रोजी मुलीच्या वडिलांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून पाच पथकांची स्थापना केली. २६ मार्च रोजी रात्री मुलीचा मृतदेह तिच्याच घराच्या बाथरूमच्या छतावर आढळला.
तपासानंतर, मोहम्मद वजीर अंसारी (Mohammed Vazir Ansari) याने मुलीची हत्या करून मृतदेह लपवल्याचे उघड झाले. अंसारीने कबूल केले की, मुलीच्या आई आणि त्याच्या पत्नीमध्ये मुलांच्या भांडणांमुळे वाद होत होते. तसेच, तो ‘झुप्पी’ (zupee) नावाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ४२,००० रुपये हरला होता, ज्यामुळे तो त्रस्त होता. या सर्व कारणांमुळे त्याने मुलीची हत्या करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीला शोधण्यासाठी घर सोडल्यावर, अंसारीने मृतदेह रेक्सीनच्या बॅगमध्ये ठेवून बाथरूमच्या छतावर लपवला आणि शोध मोहिमेत सहभागी झाला. तो मुलीच्या वडिलांसोबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठीही गेला होता, ज्यामुळे कोणालाही संशय येऊ नये.