ओरोस – सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘श्वेत गंगा’ आणून जिल्ह्यातील दूध उत्पादन एक लाखापर्यंत नेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कंबर कसली आहे. यासाठी सध्या दूध उत्पादन घेऊन चांगल्या प्रकारे व्यवसाय करणाऱ्या दूध उत्पादकांना जिल्हा बँकेने कमी व्याजदरात कर्ज वितरण करण्यास सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात जिल्ह्यातील तब्बल १०१ दूध उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज मंजुरीचे पत्र व दुधाची किटली देवून याचा प्रारंभ करण्यात आला आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील भाईसाहेब सावंत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक प्रज्ञा ढवण, विठ्ठल देसाई, रवींद्र मडगांवकर, मेघनाथ धुरी, भगीरथ प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाचे अधिकारी तथा मार्गदर्शक योगेश खराडे, सर्जेराव पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने दूध उत्पादक उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात सध्या चांगल्या प्रकारे दूध उत्पादन घेत असलेल्या रश्मी परब, ज्योती पावसकर, अनिरुद्ध करंदीकर, आत्माराम गोडबोले, ज्ञानेश्वर सावंत, मिथील सावंत, समीर पिळणकर या सात शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेच्यावतीने सत्कार झाला.
गोकुळ दूध संघाचे मार्गदर्शक खराडे म्हणाले, ‘‘दूध उत्पादन वाढविण्यासाठी बदल स्वीकारणे गरजेचे आहे. म्हैशीचे दुग्धोत्पादन सुरू केले पाहिजे. हरियाणा राज्यात मिळणाऱ्या जातिवंत म्हैशी खरेदी केल्या पाहिजेत. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळेल, असे नियोजन केले पाहिजे. जनावरांना पौष्टिक चारा द्यावा. आपण दुधासाठी आणलेले जनावर किती उत्पादन देते त्यानुसार खर्च केला पाहिजे.’’ यावेळी दूध उत्पादकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
जिल्हा बँकेची साथ
जिल्हा बँक अध्यक्ष दळवी म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना दूध उत्पादनाकडे वळण्यासाठी मोठी संधी आहे. दूध उत्पादनातून शेतकरी आर्थिक उन्नती करू शकतात, अशी जिल्हा बँकेला खात्री पटली आहे. त्यामुळे आम्ही एक लाख लिटर पर्यंत दूध उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बँकेने कमी व्याजाची योजना आणली आहे. कर्ज मिळण्यासाठी जामीनदार मिळण्याकरिता सवलत दिली आहे. केवळ कर्ज देवून जिल्हा बँक गप्प बसणार नाही तर प्रत्यक्षात एक लाख लिटर दूध उत्पादन होईपर्यंत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा बँक तत्पर असणार आहे.’’
९ टक्के व्याजाची योजना
शेतकऱ्यांनी दूध उत्पादनाकडे वळण्यासाठी जिल्हा बँकेने ९ टक्के व्याजाने योजना आणली आहे. यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदाराला दोन टक्के रक्कम परत दिली जाणार असून महिला कर्जदारांनी नियमित परतफेड केल्यास अधिक टक्के रक्कम परत केली जाणार आहे. मात्र, हे कर्ज प्रस्ताव शासनाच्या विविध योजनांत समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे. खुल्या गटातील कर्जदार असल्यास त्याचा प्रस्ताव अण्णासाहेब पाटील महामंडळ, ओबीसी कर्जदार असल्यास शामराव पेजे महामंडळ येथे सादर करून ते मंजूर करून घेण्यात येईल. मंजुरी मिळाल्यास सबंधिताला बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.