सिंधुदुर्ग : मानवतेला काळीमा फासत घडणाऱ्या जातीय अत्याचाराच्या प्रकारांना आळा बसावा, या उद्देशाने जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीसह सर्व बौद्धधर्मिय, चर्मकार समाज, मुस्लिम संघटनांनी मिळून ”जातीय प्रवृत्तीचा मडका फोड मोर्चा” जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. देशभरात घडत असलेल्या अनेक घटनांचा निषेध या मोर्चाद्वारे करण्यात आला. ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये परिवर्तनवादी विचारसरणीचे बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यानी या घटनेचा निषेध करीत घोषणाबाजी देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी संघटनेच्या विविध पदधिकाऱ्यानी मोर्चाला संबोधित करताना तीव्र शब्दात अन्यायाबाबत निषेध व्यक्त केला. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती मोर्चेकऱ्यांना सांगितली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, सत्यशोधक संघटनेचे नेते अॅड. सुदीप कांबळे, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजीत जाधव, सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, भारतीय चर्मकार समाज संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी चंद्रकांत पवार, वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव प्रमोद कासले, वंचितचे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष रोहन कदम, कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष संजय तांबे, चर्मकार संघटनेचे महानंदा चव्हाण, कास्ट्राईबचे किशोर कदम आदी सहभागी झाले होते.
अन्याय, अत्याचार, विषमतावादी जातीव्यवस्थे विरोधात संघटीतपणे लढा देण्याची गरज आहे. देशाप्रमाणे महाराष्ट्रातही अशा घटना घडत असून सिंधुदुर्गातही अट्रोसिटी कायद्यांतर्गत घडणाऱ्या घटनांमुळे माणसांच्या मनात चिड निर्माण होत आहे. या अन्यायी, अत्याचारी नराधमांना शिक्षा व्हायला हवी. जातीयवादी घटनांविरोधात संविधानवादी, मानवतावादी दृष्टीकोन असणाऱ्यांनी संघटीतपणे लढा देणे गरजेचे आहे. जातीय अत्याचाराच्या घटना देशहिताच्या दृष्टीने चिंता, काळजी, दुःख, वेदना, संताप, चिड निर्माण करणाऱ्या आहेत. देशाचे राष्ट्रीय ऐक्य आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्व मानवतावादी आणि मूल्याधिष्ठीत भारतीयांनी एकत्र येण्याची गरज आहे.यासाठी संविधानवादी, मानवतावादी, पुरोगामी नागरिकांनी चळवळ उभारावी.’’
सुदीप कांबळे म्हणाले, ‘‘समाजाची व्यवहारीक हतबलता आणि न्यायव्यवस्थेतील अनेक कारणांमुळे न्यायदान प्रक्रियेला विलंब होतो. त्यामुळे नराधमांचे फावते. अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी क्रांतीकारकरित्या एकत्र आल्याचे आज दिसून आले.” आजच्या या मोर्च्यात हजारोंच्या संखेने वंचित बहुजन समाज बांधव सहभागी झाले होते. यात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्च्याला आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला.
वंचित बहुजन आघाडी व सर्व समावेशक धार्मिक संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले होते.