रानमोडी किंवा जंगलमोडी या विदेशी तणाने सर्वत्र हाहाकार पसरविला आहे. काही वर्षांपूर्वी परदेशातून आलेल्या या तणाने घट्ट मुळे रोवायला सुरुवात केली आहे. कोकणात मोकळ्या जागांवर हे तण जलदगतीने वाढत आहे. या तणाचे वेळीच निर्मुलन झाले नाही तर शेतीला अन् जंगलाला पर्यायाने जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. “युपॅटोरियम ओडोरॅटम्” म्हणजे रानमोडी हे तण दक्षिण अमेरिका, मेक्सिको, कॅरिबियन बेटे, आशिया, पश्चिम अफ्रिका, ऑस्ट्रेलियात आढळते. ते नेमके पश्चिम घाटात कसे आले? हे समजणे अशक्य आहे. बी, रोपे किंवा अन्य माध्यमातून ते आले असावे; पण ते फोफावले आहे. पश्चिम घाटातील जंगलात, गवताळ भागात ते घुसले आहे. सुर्यफुलाच्या कुळातील रानमोडीच्या अनेक प्रजाती आहेत. यातील “ओडोरॅटम्” प्रजाती पश्चिम घाट भागात आहे. या तणाला असंख्य बिया येतात. बिया पक्व झाल्या की, फुलोऱ्याच्या साहाय्याने वाऱ्याच्या माध्यमातून प्रसार होण्यास सुरुवात होते. जनावरे, पक्षी या तणाला हात लावत नाहीत, खातही नाहीत. विशेषत: पावसाळा अन् हिवाळ्यात ते अधिक गतीने वाढत जाते. तणाच्या झुडूपावर अंदाजे ३५ ते ५० हजार बिया तयार होतात आणि ही रानमोडी जलदगतीने वाढत जाते. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या पट्ट्यात या रानमोडीची झुडपे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. ही रानमोडी अन्य झाडांना मारक ठरत असून जमिनीतील पोषक घटक मोठ्या प्रमाणात शोषून घेते. यामुळे विशेष करून कोकणातील आंबा, काजू, रतांबा आदी झाडांच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे कोकणातील शेतकरी धास्तावले आहेत.