लाल रक्तपेशींतील दोषामुळे सिकलसेल आजार होतो. जेव्हा लाल रक्तपेशी मधील हिमोग्लोबीनमध्ये ग्लुटॅमिक ॲमिनो ॲसिडच्या ऐवजी व्हॅलिन ॲमिनो ॲसिड येते. तेव्हा गोलाकार लालरक्त पेशींचा आकार बदलून त्या वक्राकार किंवा विळ्यासारख्या दिसायला लागतात. विळ्याला इंग्रजी भाषेत ‘सिकल’ असे म्हणतात. तर पेशींना ‘सेल’ म्हणतात. त्यावरुन या आजाराचे नाव ‘सिकलसेल’ असे पडले.
सिकलसेल रुग्णाच्या पेशींमधल्या हिमोग्लोबिनमुळे प्रथिनात दोष आढळतो. त्यामुळे त्यास सिकलिंग हिमोग्लोबिन असे म्हणतात. या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते. यामुळे त्या लवकर फुटतात व शरीरातील रक्त कमी होते. यालाच ॲनिमिया किंवा सिकलसेल ॲनिमिया म्हणतात. हा आजार पूर्णतः आनुवंशिक आहे.
‘सिकलसेल’ या आजारावर अद्याप थेट उपचार नाहीत. रुग्णांत जशी लक्षणे दिसतात, त्यानुसार उपाययोजना करावी लागते. रक्त कमी झाल्यास बाहेरून रक्त देणे असे करतच उपचार होतात. या आजारावर जनुकीय उपचार (जेनेटिक थेरपी) करण्याबाबत संशोधन सुरू आहे. नियमित रक्त चाचणी व योग्य आहार घेतल्यास वयोमर्यादा वाढू शकते.
१)फोलिक अॅसिडच्या गोळ्या नियमित घेणे, त्यामुळे लाल रक्तपेशींची निर्मिती होते.
२)डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेदनाशामक गोळ्या घेणे.
३)जंतुसंसर्गावर व तापावरील उपचार त्वरीत करणे.
४)लसीकरण : सिकलसेलग्रस्त सर्वच लहान मुलांचे वयोमानानुसार लसीकरण करून घेणे गरजेचे आहे.
ही काळजी घ्यावी
१)प्रथिनांची व समतोल आहाराची जास्त प्रमाणात गरज असते त्यानुसार वेळापत्रक ठरवावे.
२)भरपूर पाणी पिणे (रोज १० ग्लास)
३)भरपूर आराम करावा. ४)अतिकाम व चिंता टाळावी.
५)नियमित तपासणी व डॉक्टरी सल्ला घेत रहावा.
६)जंतुसंसर्ग झाल्यास त्वरीत डॉक्टरांना भेटावे.