सावंतवाडी : नायट्रोजन सिलिंडरचा वापर करून स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेत शहरातील माठेवाडा परिसरात राहणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज उघड झाला. जेसन गिरगोल फर्नांडिस असे त्याचे नाव असून त्याने तोंडाला पिशवी बांधून त्यात पाईपने नायट्रोजन वायू सोडून आत्महत्या केली . त्याचा मृत्यू नायट्रोजन वायू शरीरात गेल्याने गुदमरून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असले तरी नेमका मृत्यू कसा झाला, याबाबत डॉक्टरांनाही शंका आहे. त्यामुळे अधिक तपासासाठी पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. मामा जोकिम ॲन्थोनी डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.
जेसन सावंतवाडी माडेवाडा येथील त्याच्या मामाच्या घरी आईसह राहत होता. तो पंधरा दिवसांपूर्वीच मुंबईतून सावंतवाडीत आला होता. आज सकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा सकाळी उशिरापर्यंत बंद होता. मामा जोकिम यांना संशय आला. त्यांनी शिडीच्या साहाय्याने छप्परातून आत पाहिले असता जेसनने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती त्यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली. साहाय्यक पोलिस निरीक्षक तौफिक सय्यद कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. जेसनने दरवाजावर ‘डेंजर कोणीही मास्कशिवाय आत प्रवेश करू नका, मी विषारी द्रव्याचा वापर केला आहे,’ अशी सूचना लिहून ठेवली होती. त्यामुळे पोलिसांनी सावध भूमिका घेत तत्काळ आपत्कालीन यंत्रणा आणि पालिका कर्मचाऱ्यांना पाचारण केले. सुरुवातीला छप्पराची कौले काढून खबरदारी घेण्यात आली. त्यानंतर पीपीई किट परिधान करून रूममध्ये प्रवेश केला. यावेळी जेसन आतील बाथरूममध्ये नायट्रोजन सिलिंडर आणि तोंडाला प्लास्टिक पिशवी बांधलेल्या अवस्थेत दिसून आला. जेसन याने बाथरूममध्ये चटई टाकून तोंडाला प्लास्टिक पिशवी बांधून त्यात नायट्रोजन सिलिंडरचा पाईप टाकला होता. डोक्याला मार बसू नये म्हणून बाथरूमच्या नळाला सॅक अडकवली होती तर पायात मोजे घातले होते.
जेसन याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना घटनास्थळी सापडली. त्यात माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये. मी स्वतःहून आत्महत्या करत असून, देवाला भेटायला जात आहे, असे लिहिले होते. पोलिसांनी चिठ्ठी, सिलिंडर व इतर वस्तू ताब्यात घेत मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविला. जेसन याने दरवाज्यावर चिकटवलेली सूचना लक्षात घेता पोलिस उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंखे यांच्यासह निरीक्षक शंकर कोरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्याने नेमकी आत्महत्या का केली, हे मात्र समजू शकले नाही.