नांदगाव – मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली पासून काही अंतरावर असणारा निसर्गरम्य सावडाव धबधबा पावसामुळे प्रवाहित झाला आहे.गर्द हिरव्या गार वनराईतून फेसाळत कोसळणारा सावडाव धबधबा 60 ते 70 फूट रुंदीचे आणि 30 फूट उंचीच्या काळ्या कातळावरन फेसाळत कोसळतो. गर्द वनराईतून वाहत या धबधब्याचं रुपांतर पुढे ओहळात होते. गेल्या काही दिवसांपासून तो ओसंडून वाहत असल्याने आता पर्यटकांनी पाऊले या धबधब्याकडे वळू लागली आहेत. सुट्टीच्या दिवशी मुंबई, गोवा तसेच राज्याच्या अनेक भागातून पर्यटकांची तसेच स्थानिकांची येथे गर्दी होत आहे.
मान्सून जूनच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होईल अशी चिन्ह असताना जून अखेर एकदाचा दमदार पाऊस सुरु झाल्यावर जिल्हातील अनेक धबधबे प्रवाहीत झाले. जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी जिल्ह्यातून व राज्यातून अनेक पर्यटक मोठया संख्येने वर्षा पर्यटनासाठी येत असतात. विविध प्रसिध्दी माध्यमातून अनेक धबधबे पर्यटन स्थळे विकसित झाल्यावर आपुसुक पाऊले वळतात. अशातला कणकवली तालुक्यातील सावडाव हा धबधबा पावसाळ्यात ओसंडून वाहू लागल्याने सध्या सावडाव परीसर पर्यटकांनी बहरुन जावू लागला आहे. डोंगरपठारावरुन पसरट कड्यावरुन खाली कोसळणारा गर्द हिरव्या झाडा झुडपांतला आनंदाचं उधाणच आलेला सावडाव धबधबा कोसळून लागला असल्याने धबधब्याखाली आंघोळीचा अनेक पर्यटक लुटताना दिसत आहे.
ग्रामपंचायत स्तरावरुन शासनाच्या निधीतून सावडाव परीसरात रंगरंगोटी, नळपाणी योजना, स्वच्छता अशा प्रकारची कामे करण्यात आली असून पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रॅम्प, पायऱ्या, शुशोभिकरण, बाथरूम, टॉयलेट अशा प्रकारे पयाभुत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे या अपुऱ्या पडत असून त्या दर्जेदार सुविधा होण्याची गरज आहे.वर्षा पर्यटन संपेपर्यंत पोलीस संरक्षण देण्याची गरज आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे. सध्या सावडाव धबधब्यावर अभ्यगंत व पार्किंग कर लावला जात असून पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटत सहकार्य करावे, असे आवाहन उपसरपंच दत्ता काटे व ग्रामसेवक शशिकांत तांबे यानी केले आहे