मुंबई – मुंबई गोवा महामार्गावर एका फार्म हाऊसच्या बाहेर आलिशान चारचाकीत पॅरोलवर सुटलेल्या संजय कार्लेचा मृतदेह आढळला आहे. गोळ्या झाडून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बंद कारमध्ये मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
संजय हा मूळचा पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहे. सोन्याची बनावट नाणी विकून तो अनेकांची फसवणूक करायचा. त्यावर अनेक गुन्हे दाखल झाल्यानं त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. तो पोलिसांच्या अटकेत देखील होता. सहा महिन्यांपूर्वीच तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर आता त्याच्या हत्येची बातमी समोर आली आहे.
नारायण राणे यांच्या फार्महाऊस पासून साधारण १०० फूट लांब गाडीत संजय कार्लेचा मृतदेह सापडला आहे. मुंबई पोलीस याचा तपास करत आहे. मृतदेह आढळलेली कार बंद असल्याने मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. मात्र तज्ज्ञांच्या मदतीने कारचे दार उघडण्यात यश आलं. या कारमध्ये संजय कार्लेचा मृतदेह आढळून आला. त्याच्या छातीवर वार झाल्याच्या खुणा आहेत. या ठिकाणी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून फारेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे.