रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील आंबेड-डिंगणी रहादरीच्या रस्त्याने रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या दुचाकीवर बिबट्याने उडी मारल्याने दुचाकी घसरून दोघेजण जखमी झालेले आहेत. संगमेश्वर तालुक्यामधील मंदार रहाटे,प्राजक्ता चव्हाण हे दोघे रेल्वे स्टेशनकडे जात होता. त्यावेळी शास्त्रीपुल आंबेड ते डिंगणी रस्त्याने पुढे जाताना रस्त्याच्या जंगलमय भागात आल्यावर बिबट्याने अचानकपणे गर्द झाडीतून रस्त्यावर उडी मारली. यामुळे बिबट्याची धडक दुचाकीला बसून दुचाकी रस्त्यावर घसरून पडली. त्यानंतर बिबट्या बाजूच्या जंगलात पसार झाला. मात्र, दुचाकीवरुन प्रवास करणारे दोघेही जखमी झाले. जखमीना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने संगमेश्वर शहर आणि परिसरात दर्शन देवून दहशत निर्माण केली आहे. संगमेश्वर बाजारपेठेतील रस्त्याने कार घेऊन जाताना सौरभ रसाळ यांच्या कारच्या कॅमेरात बिबट्या कैद झाला होता. त्यानंतर सौरभ यांच्या घरासमोरून कुत्र्याचे पिल्लू पळवून नेताना सुद्धा बिबट्या कॅमेरात सापडलेला होता. त्याशिवाय परिसरात रात्री आणि दिवसाही बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले होते. आज सकाळी 8 च्या सुमारास आंबेड डिंगणी रस्त्यावर भक्षाच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्याने दुचाकीवर उडी घेतल्याने दुचाकी घसरून दोघेजण जखमी झालेले आहेत. याची दाखल वनखात्याने घ्यावी, अशी मागणी वाढत आहे.