सध्या कोकणामध्ये बिबट्याचा वावर सर्वत्र दिसून येत आहे. आज देखील देवरूख-साखरपा या राज्य मार्गावर देवरूख येथील कांजीवरा परिसरातील रमेश साडविलकर यांच्या घरासमोर पहाटे ५.३०ते६.००चे दरम्यान बिबट्या दिसला परंतु तो मृत अवस्थेत पडला होता. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सदरचा बिबट्या मृत झाल्याचे दिसून आले. देवरूख वनविभागाला खबर मिळताच अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी करून पंचनामा करून बिबट्याला शवविच्छेदन करण्यासाठी वनपाल कार्यालयात नेण्यात आले असून देवरूख येथील पशुसंवर्धन अधिकारी यांना पाचारण करण्यात आले. गेले अनेक दिवस देवरूख शहरातील विविध ठिकाणी भर दिवसा बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.