कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Shivsena UBT पक्षाला गेल्या काही महिन्यात मोठे धक्के बसले आहेत. अनेक बडे नेते एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) शिवसेना किंवा भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर आता ठाकरे गटात कोकणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण २०१९ मध्ये गुहागर विधानसभा निवडणूक लढवलेल्या सहदेव बेटकर (Sahadev Betkar) यांनी ठाकरे गटात घरवापसी केली आहे. ठाकरेंच्या साथीला येत असल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
सहदेव बेटकर यांचा आज मुंबईत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) ‘मातोश्री’ निवासस्थानी प्रवेश पार पडला. शिवसेना सोडून ते काही काळापूर्वी काँग्रेसमध्ये (Congress) गेले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा ठाकरेंचा झेंडा हाती धरला आहे.