रत्नागिरी : माझे मत आहे, की यापुढे शिवसेनेने स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवाव्यात. महाराष्ट्राला शिवसेना म्हणून सामोरे जावे. मला खात्री आहे, की उभा महाराष्ट्र शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना स्वीकारेल. एकनाथ शिंदे गटाच्या मागणीशी माझ्या मताचा संबंध नाही; पण स्वबळाची मागणी करण्यासाठी बेईमानी, गद्दारी, बापाला नालायक म्हणण्याची गरज आहे का? शिंदे गटाला या विषयावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, असे शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते यांनी शिंदे गटाला ठणकावले.रत्नागिरी दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेत दोन गट पडून अनेकजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असताना उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले माजी खासदार अनंत गीते यांनी स्वबळाबाबत मोठे विधान केले. गीते म्हणाले, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आपले मत मांडण्याचा हक्क आहे. आईला विकण्याची गरज आहे का? काही गरज नाही. शिंदे गटाला या विषयावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राहिलेला नाही, असेही गीते यांनी ठणकावून सांगितले. शिंदे गटाची आता दखल घेण्याची गरज नाही, असं देखील गिते यांनी स्पष्ट केले.