मुले चोरणारी कथित टोळी सक्रिय असल्याची अफवा

- Advertisement -

रत्नागिरी: शहर आणि परिसर गेल्या काही दिवसांपासून अफवांच्या घेऱ्यात आहे अन्‌ भयग्रस्तदेखील . शहरात झालेले लागोपाठ दोन खून, लुटीचे प्रकार आणि आता मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याबाबत असलेल्या भीतीमुळे ही मानसिकता तयार झाली आहे. पोलिस दलाने याबाबत वारंवार खुलासा केला आहे की, मुलं पळविणारी कोणतीही टोळी रत्नागिरीत किंवा जिल्ह्यात सक्रिय नाही. तरी नागरिकांच्या मनातील भीतीने ठाण मांडले आहे, याचा पडताळा पाठोपाठच्या तीन घटनांत आला. अनोळखी किंवा वेगळ्या वेशभूषेतील व्यक्ती दिसल्यास नागरिक त्यांच्यावर तुटून पडत आहेत. मेस्त्री हायस्कूलमध्ये आर्थिक मदत मागण्यासाठी आलेल्या महिलेला अशाच मानसिकतेतून नागरिकांनी मारहाण केली. नागरिकांनी सजगता दाखवली तरी अतिउत्साह दाखवून चालणार नाही.

जमावाच्या मानसिकतेचा कोणी बळी ठरू नये म्हणून या वातावरणात समाजातील वेगळ्या आयामांची दखल घेणे आवश्यक आहे. पोलिस याबाबत करत असलेली जागृती अन्‌ त्यांच्या प्रयत्नांना मदत मिळणे आवश्यक आहे.

जिल्ह्याची पोलिस यंत्रणा कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यास सक्षम आहे. वारंवार गंभीर गुन्हे घडत असले तरी काही तासात पोलिसांनी हे गुन्हे उघड केले आहेत. त्याबद्दल पोलिस दलाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मात्र, या घटना काही सांगून घडत नाही. कठीण परिस्थितीमध्ये पोलिस असो वा सर्वसामान्य नागरिक यांनी आपली विवेक शक्ती गमावून चालणार नाही. परंतु, घटना घडल्याची पूर्वकल्पना नसताना त्याबाबत हमखास घटना घडल्याच्या आवेशात दुसऱ्याला ही माहिती देणे योग्य नाही.त्यामुळे वाऱ्यासारख्या या घटना पसरतात आणि नागरिकांमध्ये भीती आणि गैरसमज निर्माण होतो. पोलिसांनी केलेल्या खुलाशावरून हेच दिसत आहे. मुले पळविण्याबाबत एकही तक्रार पोलिसांकडे दाखल नाही किंवा तशी खबरही नाही. तरी ही टोळी सक्रिय असल्याचे चित्र उभे करून नागरिकांमध्ये टोळीची दहशत निर्माण केली जाते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रत्नागिरीत माजी पंचयात समिती सभापती स्वप्नाली सावंत यांचा खून, त्यानंतर शहरात दोन ठिकाणी वृद्धांना लुटण्याचे झालेले प्रकार, त्यानंतर ठाण्यातील सोने-चांदीचा व्यापारी कोठारी यांचा शहरातच झालेला खून, चोऱ्यांचे वाढते प्रमाण आणि आता मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा, या सर्व घटनांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेच्यादृष्टीने आलेली सजगता ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्याचा अतिरेक झाला की, मग मेस्त्री हायस्कूमध्ये मुलं पळविणारी महिला आल्याच्या गैरसमजातून झालेली मारहाण, चिपळूणमधील शाळेनजीक झालेला गोंधळ हे प्रकार घडत राहणार आणि असे प्रकार घडणं धोकादायक आहे.जमावाला कोणतीही ओळख नसते. त्यामुळे एखाद्याने हात उगारला की पाठून किती हात पडतात त्याचा पत्ताच लागत नाही. विवेक गमावून मारहाण करण्यापेक्षा वस्तुस्थिती जाणून घेऊन उचललेले पाऊल कधीही चांगले. संयमी भूमिका महत्वाची आहे .

रत्नागिरी पोलिसांकडून नागरिकांना संशयितरित्या फिरत असणाऱ्या महिला व पुरुष यांचेबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मेस्त्री हायस्कूलमध्ये काम करणारे गैरसमजातून महिलेला जमावाने मारहण केली. सारिका राहूल धुमाळ (वय 32 वर्षे, रा. पंढरपूर रोड, धनराज हॉटेलच्यामागे, मिरज सांगली सध्यारा. खेडशी ता. जि. रत्नागिरी) असे त्या महिलेचे नाव आहे. महिलेचा गुन्हेगारी रेकॉर्डची पडताळणी केली असता महिलेविरुद्ध मिरज पोलिस ठाणे (जि. सांगली) जबरदस्ती घरात शिरून चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. तिच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी शहर परिसरात अशा प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत रत्नागिरी जिल्हा पोलिस कट्रोल रुम फोन संपर्क क्र. 02352 / 222222, रत्नागिरी शहर पोलिस ठाणे संपर्क क्र. 02352/222333 व .डायल 112 या संपर्क क्रमांकावर तात्काळ कळविण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी केले आहे.

शहर, परिसरामध्ये मुले पळविणारी कोणतीही टोळी नाही, या सर्व अफवा आहे. आम्ही प्रत्येक शाळा, कॉलेजमध्ये जाऊन जनजागृती करत आहोत. यामध्ये पोलिस मित्रांनाही आम्ही मदतीला घेतले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेत आहोत. सोशल मीडियावर आवाहन केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. त्याची खात्री करा आणि तशी काही घटना घडल्यास तत्काळ पोलिस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्षात कळावा. संयम ठेवाकायदा हातात घेऊ नका. आम्ही खात्री करून पुढील कारवाई करू.लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, त्या घटनेची खात्री करावी. किमान इतरांना माहिती देताना देखील आपल्या बुद्धीचा वापर करून कृती करावी. एखादी घटना डोळ्यासमोर असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, रत्नागिरीतील पोलिस यंत्रणा सक्षम आहे. जेणेकरून अशा घटना घडणार नाही.शाळांचा विचार करता सोशल मीडियात व्हायरल झालेली एखादी घटना पटकन समोर येते आणि अफवांचा बाजार सुरू होतो. प्रत्येक जण मुलाला शाळेत पाठवायचा की नाही इथंपर्यंत मजल जाते. तर, अशा घटनांची पालकांनी खात्री करावा अथवा जमावात असताना पोलिसांनी कळवून त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात द्यावे. रत्नागिरी पोलिस गुन्ह्याच्या तळापर्यंत जाण्यास सक्षम आहे. पालकांनी अफवावर विश्वास ठेवू नये.असे पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. 

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

12,546FansLike
75,569FollowersFollow
2,564FollowersFollow
191,558SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles