गंगा आल्यांनतर पाऊस लांबतो, असे गंगा आगमनानंतर सर्रास बोलले जाते . त्याचे प्रत्यंतर आता येऊ लागले आहे. मे महिन्यात देखील गंगेचे आगमन झाले आणि पावसावर त्याचा परिणाम होणार , अशा नेहमीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्याचीच परिचिती आता येऊ लागली आहे. अर्धा जून संपला तरी पावसाचा रुसवा न संपल्याने गंगा आगमनाने पावसावर परिणाम झाला की काय या शंकांना पुष्ठी मिळू लागली आहे.
मे महिन्यात राजापूरच्या गंगामाईचे आगमन झाले होते. मूळ गंगेसह सर्व कुंडात चांगल्यापैकी पाणी आहे. गोमुखातून अविरत धार सुरु आहे ,गंगक्षेत्रावर अजूनही भाविक स्नानासाठी येत आहेत. पावसाळा देखील सुरु झाला आहे दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होते. मात्र अर्धा जून संपला तरी देखील समाधानकारक पाऊस पडलेला नाही. जून महिन्याच्या उत्तरार्धात ज्या प्रमाणात पावसाला वेग येतो. पण तसा पाऊस पडत नसल्याचे आजचे चित्र आहे.
सर्वत्र उन्हाळ्याप्रमाणेच कडाक्याचे ऊन पाहायला मिळते आहे. तालुक्याच्या पूर्व परिसरात दिवसातून कधीतरी पावसाची हलकी सर पाहायला मिळते. मात्र बाकी तालुक्यात त्याचे प्रमाण फारच कमी आहे. तुरळक प्रमाणात पाऊस पडतो असे चित्र आहे. वैज्ञानिक दृष्टया यामागे विविध करणे असली तरी लांबलेल्या पावसाचा संबंध नेहमी प्रमाणे जोडला जातोच. गंगा अली कि पाऊस लांबतो असे स्थानिक जाणकार आणि वयोवृद्ध लोकांकडून हमखास ऐकायला मिळते. तसे बऱ्याच वेळा पाहायलाही मिळाले आहे. नेमके यावेळेही तसे काहीसे चित्र या महिन्यांत पाहायला मिळत आहे. दर तीन वर्षांनी प्रकट होणाऱ्या गंगेच्या आगमन व गमन काळात गेल्या वर्षांत बदल झाले आहेत. या काळात सलग दुसऱ्या वर्षीही गंगा आल्याची घटना घडली आहे.