रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. हे सत्र सुरुच असून आज पहाटेही पुन्हा एकदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळली त्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. या घाटात दरड कोसळून वाहतूक कोंडीही झाली होती. काही काळ पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. मुसळधार पावसामुळे अनुस्कुरा घाट सध्या प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात धुव्वाधार पाऊस झाला असून या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोकाही वाढला आहे. परिणामी वाहन चालकांनाही खबरदारी बाळगून आणि सतर्क राहत या मार्गावरुन गाड्या हाकण्याचं आवाहन केलं जातंय. अनुस्कुरा घाटामध्ये आज सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली. यामुळे रत्नागिरीवरुन राजापूर कोल्हापूरमार्गे पुण्याला जाणारी एसी बस घाटात घडकली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहतुकीची मोठी कोंडी होऊन दूरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
सातत्यानं दरड कोसळण्याच्या घटना
अनुस्कुरा घाट हा कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या प्रमुख घाटांपैकी एक आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या घाटात गेल्या काही दिवसांत अनेकदा दरड कोसळण्याच्या घटनांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर अनेकदा घाटमार्गातील काही भागात एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आलेली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना समोर आल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे .