रत्नागिरी : आगामी नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान केले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१चे कलम ३६ प्रमाणे जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी हे अधिकार दिले. २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत हे अधिकार राहणार आहेत.
जिल्ह्यात २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये कोणतीही अनुचित व अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्थेस बाधा येऊ नये यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. या अधिकारानुसार रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा रॅलीतील, जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी, याविषयी आदेश देणारी रॅली कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळेत काढाव्यात किंवा काढू नयेत, असे मार्ग किंवा वेळा विहित करणे. सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होणार नाही, याची दक्षता घेणे.
घाटावर, धक्क्यावर सार्वजनिक स्नानाच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी, जत्रा, देवालये आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणे. ढोलताशे व इतर वाद्ये वाजवण्याचे किंवा गाणी गाण्याचे व इतर वाद्ये वाजवणे, नियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, लाऊड स्पीकरवर नियंत्रण ठेवणे, सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमनाची कलमे ३३, ३४, ३५, ३७ ते ४१ अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य ते आदेश देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.