दाभोळ : धूपप्रतिबंधक बंधारे नसल्याने मुरूड येथील समुद्रकिनारा पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाने उद्ध्वस्त होत आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या बागायती शेतीचे मोठे नुकसान होत आहे. गेले काही दिवस सातत्याने किनारी भागात लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे. आज वेगाने आलेल्या लाटांनी चार ते पाच नारळाची झाडे उन्मळून पडली. किनाऱ्यावर असलेल्या रिसॉर्टचेही मोठे नुकसान झाले आहे.
मुरूड समुद्रकिनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा, अशी बागायतदारांची मागील अनेक वर्षांपासून मागणी आहे. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधीही याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची खंत आहे. मुरूड गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथील किनाऱ्यावरील नारळ, पोफळीच्या बागा, उंच वाढणारे सुरू पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतात. परंतु ही बागायती शेती आता समुद्राच्या उधाणामुळे उन्मळून जमीनदोस्त होत आहे.
गेले काही दिवस सातत्याने किनारी भागात लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे. आज वेगाने आलेल्या लाटांनी चार ते पाच नारळाची झाडे उन्मळून पडली. किनाऱ्यावर असलेल्या रिसॉर्टचेही मोठे नुकसान झाले आहे. लाकडी बेंच लाटांच्या तडाख्यात वाहून गेली. समुद्रकिनाऱ्यांवर धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज आहे. मुरूड येथील जमिनीत उधाणाचे पाणी शिरून संरक्षण भिंतीचे नुकसान झाले.नारळाची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. अनेकांच्या शेत जमिनीत पाणी शिरले. १५ जणांचे या उधाणामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा व्हावा यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तलाठी, सरपंच यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. त्यामुळे नुकसानीचा पंचनामा कधी केला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.