रत्नागिरी – शहरातील मांडवी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलेल्या काही व्यक्तींना पाण्यासोबत वाहत आलेल्या शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटा सापडल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती. ही चर्चा पोलिसांच्या कानावर आल्यावर पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता काहीच आढळून आले नाही. त्यामुळे या घटनेबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. मांडवी समुद्रकिनाऱ्यावर जेटीच्या उजव्या बाजूला हा प्रकार घडल्याची चर्चा सुरु होती. या भागात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. याठिकाणी बीच छोटा असून खडकाळ भाग अधिक आहे. शंभर, पन्नास आणि दहा रुपयांच्या नोटा काही व्यक्तींना पाण्यात दिसून आल्या. या नोटा वाहून आल्या की पूजेच्या निर्माल्यामधून चुकून पाण्यात पडल्या असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मांडवी परिसरात याची जोरदार चर्चा असून, सोशल मीडियावरून हा प्रकार शहरात पसरला.पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर साडेआठ-नऊ वाजण्याच्या सुमारास पोलीस व काही नागरिकांनी मांडवी बीच व किनाऱ्याची पाहणी केली. मात्र त्याठिकाणी संशयास्पद असे काही आणि नोटा असे काहीच आढळले नाही. परिसरातील नागरिकांमध्ये यांची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.