राजापूर : महाराष्ट्राला कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील ओणी पाचल अणुस्कूरा मार्गावर घाटामध्ये बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटेच्या दरम्याने दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या कोकण परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून, सर्वत्र पाण्याची पातळी वाढली आहे. गतवर्षी आंबा घाट बंद पडल्यानंतर या घाट मार्गावरून कोल्हापूरकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू करण्यात आली होती, मात्र त्यानंतर या घाटात देखील रस्त्याच्या अनेक अडचणी निर्माण झाल्यावर डागडुजी करण्याचे कोणतेही काम झाले नाही.
गेले काही दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडत आहेत . या पावसाचा परिमाण ओणी अणुस्कुरा घाटात बुधवारी मध्यरात्री ते गुरुवारी पहाटेच्या दरम्यान दरड कोसळण्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती कळताच राजापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रास्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले असून गुरुवारी घाटातील दरड काही प्रमाणात हटवण्यात आली असून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वप्नील बावधनकर यांच्याकडून देण्यात आली असून नागरिकांनी प्रवास करताना काळजी घ्यावी असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.