रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया… पुढल्या वर्षी लवकर या..’ च्या जयघोषात गुरुवारी जिल्ह्यातील दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन भक्तिभावाने झाले. पावसाच्या विश्रांतीमुळे वाजतगाजत गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. जिल्ह्यात १३ हजार १२२ घरगुती, तर ५ सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन झाले. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात दीड लाखापेक्षा अधिक बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तांच्या घरी दीड दिवसाचा पाहुणचार घेतल्यानंतर घरगुती आणि ५ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात झाले. रत्नागिरी शहरात मांडवी समुद्र किनारी गणेशभक्तांनी विसर्जनासाठी मोठी गर्दी केली होती. बहुसंख्य गणेशभक्त खासगी वाहनांमधून गणरायाला विसर्जनासाठी नेत होते.
किनाऱ्यावर वाहतूक पोलिसांसह शहर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. किनाऱ्यावर वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जात होती. निर्माल्य संकलनासाठी पालिकेने व्यवस्था केलेली होती. समुद्राच्या खोल पाण्यात मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी काही तरुणही उपस्थित होते. बाप्पाची मनोभावे आरती झाल्यानंतर त्या तरुणांमार्फत मूर्ती पाण्यात नेली जात होती. ग्रामीण भागात नदी, तलाव येथे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात १३ हजार २२२ घरगुती आणि ५ सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये रत्नागिरी शहरातील ४३८ ग्रामीण भागात ११४, जयगड परिसरात २७२, संगमेश्वर ७३६, राजापूर २ हजार ४७५, नाटे ४९२, लांजा १२५, देवरूख २६५, सावर्डे ११५, चिपळूण १०९, गुहागर ६२०, अलोरे २००, खेड ९४३, दापोली १,२०५, मंडणगड ९२४, बाणकोटमध्ये २१५, पूर्णगडमध्ये १३६ आणि दाभोळमधील ३९० गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. खेड, दापोली, चिपळूण, अलोरे आणि लांजा येथील प्रत्येकी एक सार्वजनिक गणपती विसर्जन करण्यात आला.