रत्नागिरी – विद्यार्थ्यांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या ई-सिगारेटच्या व्यसनाबाबत गंभीर दखल घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील तेली आळी नाका येथील जय गगनगिरी जनरल स्टोअरवर ४ ऑगस्ट २०२५ रोजी छापा टाकून तब्बल १ लाख ७२ हजार ५०० रुपये किमतीच्या ६९ ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी दुकानमालक गोविंद दिनेश गजरा याला अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शाळकरी मुलांमध्ये ई-सिगारेटच्या वापराचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले होते. विद्यार्थ्यांच्या दप्तरातूनही या वस्तू आढळून आल्याने शिक्षकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या आदेशाने एक विशेष पथक तयार करण्यात आले.

या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी जय गगनगिरी जनरल स्टोअरवर छापा टाकला आणि ई-सिगारेट विक्रीविरोधात २०१९ च्या कायद्यानुसार कारवाई केली. या कारवाईत कलम ७ व ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पो.उ.नि. सागर शिंदे, सपोफौ दिपक साळवी आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी शाळा-कॉलेज परिसरातील तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिक आणि शिक्षकांनी अशा प्रकारच्या घटनांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Google search engine
Previous articleखेडमध्ये महिलेसोबत लैंगिक अत्याचार; आरोपीस १० वर्षांची सक्तमजुरी
Next articleचिपळूणमध्ये सेवानिवृत्त शिक्षिकेची निर्घृण हत्या; परिसरात भीतीचे वातावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here