रत्नागिरी – जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी बरखास्त होऊन आता नव्याने जिल्हाध्यक्ष पदासह कार्यकारिणी तयार होणार आहे. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी चिपळूण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांच्यावर दिली जाणार असल्याची माहिती मिळत असून तालुकाध्यक्ष पदावर विद्यमान शहर अध्यक्ष लियाकत शाह यांची वर्णी लागण्याची शक्यता काँग्रेस वर्तुळातून व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर दीर्घ कालावधीनंतर गांधी घराण्याबाहेरील मल्लिकार्जुन खरगे यांच्या रुपाने नेतृत्व लाभले असून खरगे यांनी सूत्रे स्वीकारताच देशभरातील पक्षाची सर्व कार्यकारिणी बरखास्त केली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीत विविध पदांवर प्रामुख्याने तरूणांना संधी देण्यासाठी नव्याने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. पक्षाची केंद्रीय पातळीपासून तालुका पातळीपर्यंतची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याने आता नव्याने शहर अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्ष पदापर्यंत पदाधिकारी नेमणूक होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देखील कार्यकारिणी फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे मूळ जिल्ह्यातील असले तरीदेखील त्यांचे कामकाज बहुतांश मुंबईतूनच चालते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना योग्य ते सार्गदर्शन मिळत नाही. पक्षाचे कार्यक्रम, रूपरेषा ठरविण्यासाठी जिल्हाध्यक्षांकडे संपर्क होऊ शकत नाही. सामान्य नागरिक, हितचिंतक, मतदार तसेच पदाधिकारी यांच्या भेटीगाठी होत नाहीत. अशी एकूणच जिल्हा पदाधिकाऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता नव्याने होण्याची शक्यता असलेल्या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी चिपळूणचे विद्यमान तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता काँग्रेस वर्तुळात व्यक्त होत आहे. विद्यमान शहर अध्यक्ष लियाकत शाह यांच्याकडे चिपळूण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.