कोकणातल्या विशेषत: रत्नागिरीतल्या शेतकर्यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देव दिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. नरक चतुर्दर्शीला रत्नागिरीतला शेतकरी भाताच्या कापणीत गुंतलेला असतो. तर देवदिवाळीला त्याच्या घरात धान्य लक्ष्मीचे आगमन झालेले असते. अर्थात तो समृध्द बनलेला असतो, त्यामुळे देवदिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता, लोकोत्सव असतो. गावागावातल्या देवादिकांच्या जत्राही याचमुळे केवळ देवदिवाळीपासूनच सुरू होतात.नरक चतुर्दर्शीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. देवदिवाळीलाही ती आहे. मात्र देवदिवाळीच्या अभ्यंगस्नानाचा पहिला मान गोठ्यातल्या बैलाचा.. गायीचा! आधी त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालायची, गोठ्यात दिवे लावायचे. दिव्याने गुरांना ओवाळायचं. मग गुरांना आंबोळ्या खायला घालायच्या..! नरकचतुर्दशीला आधी आपल्या पोटोबाची सोय केली आहे, तर देव दिवाळीला गुरांढोरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची रित शिकवलेली आहे, अशी ही शेतकर्याची संस्कृती आहे.देव दिवाळीचा महत्वाचा विधी आहे तो विडे ठेवण्याचा. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्यांच्या घरात हा विधी पार पडतो. या पंरपरेतही उर भरून येणारा अर्थ दडला आहे. तो समजून घेतला की, या परंपरेचे जतन इथल्या शेतकर्यांच्यात कसा आत्मविश्वास रूजवित आहे, ते समजून येेईल.‘इडा टळो..पीडा टळो..माझ्या बळीचं राज्य येवो..’ या उक्तीचा जागर कोकणात घरोघरी देवदिवाळीला होतो. बळीचे राज्य कसे न्यायी राज्य होते. तेथील जनता कशी सुखी-समाधानी होती. हे सारे चित्र या एकाच उक्तीतून काहीही न सांगता समोर दिसते. हजारो वर्षानंतरही आज शेतकर्याला दुसर्या कुणाची नव्हे तर, कधीकाळी होऊन गेलेल्या बळीच्या राज्याचीच आस लागली आहे, यावरून बळीराज्याची कल्पना येते.