रत्नागिरी : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची नांदेड येथील वाघाला महानगरपालिका येथे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली आहे. यांच्या जागी पुणे येथील एमएससीईआरटीचे संचालक देवेंद्र सिंग हे रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती पुजारी यांची नियुक्ती झाली आहे.
राज्य सरकारने राज्यातील ४४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी काल रात्री उशिरा जाहीर केली. त्यामध्ये रत्नागिरीत दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची अवघ्या सव्वा वर्षांमध्येच बदली झाली आहे. पाटील मुळातच पर्यावरणप्रेमी आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर पर्यटनदृष्ट्या जिल्ह्याच्या विकासावर भर दिला. गोवा, केरळप्रमाणे रत्नागिरी किनाऱ्यावही पर्यटन वाढावे यासाठी किनाऱ्यांच्या स्वच्छतेसह विकासासाठी प्रयत्न केला. बॅकवॉटर टूरिझमवर त्यांचा जोर होता; परंतु त्याला अपेक्षित यश आले नाही. त्यानतंर त्यांनी जिल्ह्यात प्लास्टिकमुक्तीचा निर्धार केला. विविध संस्था, व्यापारी, व्यावसायिक आदींची बैठक घेऊन त्यांनी त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिकवर जोरदार कारवाई सुरू आहे.
चिपळूणला आलेल्या महापुराला तोंड देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा सर्वाधिक वापर त्यांनी केला. त्यामुळे हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा, किती पाऊस पडला, नदीपत्रात किती पाणी आहे, महापूर येण्यापूर्वी दिले जाणारे अलार्म, एका ठिकाणाहून जिल्ह्यात आपत्तीच्या कक्षेत असलेल्या गावांना सूचना देणारी यंत्रणाही त्यांनी उभी केली. अशा अनेक यंत्रणा त्यांनी वापरून नैसर्गिक आपत्तीवर मात करणारी यंत्रणा उभी केली. नम्र आणि प्रत्येकाचे म्हणणे ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या जागी आता नवीन जिल्हाधिकारी म्हणून देवेंद्र सिंग रुजू होणार आहेत.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनीही आपल्या कामातून वेगळा ठसा उमटवला होता. मागील कालावधीमध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यातील संबंध ताणले होते; मात्र जाखड यांनी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधून जिल्हा परिषदेचा उत्तम कारभार हाकला. जिल्हा नियोजनकडून येणाऱ्या निधीचा योग्य विनियोग केला. कोरोना काळातही जास्तीत जास्त निधी खर्ची टाकण्यात त्यांच मोलाचे योगदान होते. जलजीवन मिशन, स्वच्छता अभियान, महिला बचतगटांना उभारी देणे असे विविध उपक्रम त्यांनी या कालावधीमध्ये य़शस्वी दिले. कोरोना लसीकरण गावागावात पोहचवण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांचे त्यांनी नियोजन केले होते. मंडणगडसारख्या दुर्गम भागातही लस पोचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या जागी आता किर्ती पुजारी यांची नियुक्ती झाली आहे.